शिरूर प्रतिनिधी
:शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे बेकायदेशीरपणे भिशी चालवून गुंतवणुकीची रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सुमारे ३९ जणांकडून २० कोटींहून अधिक रक्कम जमा करून तिचा कथित अपहार केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.शिरूर न्यायालयाने त्यांना सोमवार, २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे. आरोपींनी २०२० मध्ये कारेगाव येथे भिशी मंडळ सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी नसतानाही भिशी मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवून लोकांना गुंतवणुकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. ही भिशी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम आणि परतावा मागितल्यानंतर संबंधितांनी टाळाटाळ केल्याचा तसेच काही जणांना दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.


