
मंचर : प्रतिनिधी
दूध भेसळ प्रकरणातील दोषींविरोधातील कारवाई थंडावलेली नसून अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मात्र, तपास अंतिम टप्प्यापर्यंत पोहचण्यास अथवा दोषींवर कठोर कारवाई करण्यास विलंब झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिला.
मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देवदत्त निकम बोलत होते.या वेळी विशाल वाबळे, अमोल शेलार, विशाल भोर आदी उपस्थित होते.
निकम म्हणाले की, दूध भेसळ प्रकरण हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तपासात कोणालाही पाठीशीघालण्याचा प्रयत्न होऊ नये आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दोषींना कठोर शिक्षा मिळाल्यास भविष्यात अशा प्रकारच्या भेसळीला आळा बसेल, असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाई पूर्ण करावी, असे आवाहन केले. कारवाईत दिरंगाई झाल्यास जनतेच्या पाठिंब्याने पुन्हा आंदोलन उभारले जाईल आणि दूध भेसळखोरांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धारही देवदत्त निकम यांनी व्यक्त केला…

