मंचर, दि. 26 प्रतिनिधी:-
आंबेगाव तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रे आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये जादा शुल्क आकारणी व विविध अनियमिततांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जुन्नर-आंबेगाव उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांच्या निर्देशानुसार तालुकाभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार सेवा मिळाव्यात आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक पिळवणूक होऊ नये, हा या मोहिमेचा उद्देश असल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.उपविभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकार्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महा-ई-सेवा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सेवा शुल्क, नोंदवही, पावत्या, सेवा वितरणाची पद्धत तसेच शासनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची सखोल तपासणी करायची आहे. तपासणीदरम्यान आढळणाऱ्यात्रुटींचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आंबेगाव मंडळातील तपासणीची जबाबदारी मंडल अधिकारी सीताराम तुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाटण, डिंभे बुद्रुक, जांभोरी, फालोडे, तळेघर, गोहे बुद्रुक, बोरघर, कोलबळ आणि राजेवाडी येथील महा-ई-सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. ही विशेष तपासणी मोहीम २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
महा-ई-सेवा केंद्रांनी शासनाने निश्चित केलेले दर आणि नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. नागरिकांची फसवणूक किंवा जादा शुल्क आकारणी आढळल्यास संबंधित केंद्रांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनीही अशा तक्रारी प्रशासनाकडे निःसंकोचपणे नोंदवाव्यात
अर्चना तांबे, प्रांताधिकारी, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी

