मंचर : आंबेगाव तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून सर्रास दुचाकी चालविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असून, अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापतीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविणे, वाहन चालविताना आढळणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर तसेच रोडरोमिओंवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणे, संबंधित पालक व वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करणे, वाहतूक पोलिसांकडून नियमित तपासणी करणे तसेच शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत जनजागृती अभियान राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘विद्यार्थ्यांचे अमूल्य जीवन वाचविण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. अपघात रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणीसोबत जनजागृतीही तितकीच आवश्यक आहे,’ असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच अनिल पडवळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिजाभाऊ आवटे, बाळासाहेब रोडे तसेच ग्रामस्थ आणि हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.


