
पिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी)
- विशालनगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या नवनिर्मित पुलावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, येथील स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन नेमकं करतंय काय? असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे यांनी उपस्थित केला आहे.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याच पद्धतीने विशालनगर परिसरातील नवीन पुलावर कचरा टाकून तो तसाच पडून राहिल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, मुख्य रस्त्यांवरील आणि पुलांवरील साध्या कचऱ्याचे व्यवस्थापनही प्रशासनाला करता येत नाही. प्रशासनाने तातडीने हा कचरा उचलला नाही, तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा सर्व कचरा स्वतः उचलतील आणि थेट पालिकेच्या आवारात आणून टाकतील, असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.


