मंचर, येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण बस स्थानक अंधारात बुडाले होते. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.बस स्थानकातील प्रकाशव्यवस्था बंद असल्याने बसमध्ये चढताना व उतरताना अपघात होण्याचा धोका वाढला होता.तसेच अंधाराचा फायदा घेऊन संशयास्पद हालचाली होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बस स्थानकात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रवाशांनी आगार प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, उद्या वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन मिळूनही काही दिवस परिस्थितीत सुधारणाझाली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बाणखेले यांनी बस स्थानकातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करून प्रकाशव्यवस्था कार्यान्वित करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.


