
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ऐतिहासिक वारसालाही बसू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांनी हा वारसा तातडीने जतन करण्याची मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा ऐतिहासिक वाडा आजही त्यांच्या स्मृती जपून उभा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या वाड्याचा काही भाग कोसळला आहे.
या वास्तूची अवस्था यापूर्वीही जीर्ण झाली होती. याबाबत मंचर नगरपंचायतीने वेळोवेळी दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप प्रभावी दुरुस्ती न झाल्याने अखेर पावसाच्या तडाख्यात वाड्याचा काही भाग कोसळला.
या घटनेनंतर मंचरमधील ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. शांता शेळके यांचा साहित्यिक वारसा जपणारी ही वास्तू जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, या वास्तूचे तातडीने संवर्धन आणि दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र हा प्रकार सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जपण्याच्या दृष्टीने गंभीर इशारा मानला जात आहे.
कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतींशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

