गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यातच शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही भेट घेतली होती. या राजकीय भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी खरंच भाजपाबरोबर जाणार का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होणार का? तसेच जयंत पाटलांना खरंच अर्थमंत्रिपद मिळणार आहे का? या सर्व प्रश्नांवर आता जयंत पाटील यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. एनडीएकडून आम्हाला आमंत्रण नसून जाण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. आम्ही कोणतंही खातं मागितलेलं नाही’, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. “एनडीएने काय आम्हाला निमंत्रण दिलंय? तेव्हा तिकडे जाण्याचा प्रश्न निर्माण होतो? पण असा प्रश्न तुमच्या मनात येतोच कसा? आम्ही कोणत्याही स्पर्धेत नाहीत. आम्ही कोणतंही खातं मागितलेलं नाही. मात्र, तुम्ही त्याआधीच मला गेल्या दोन-तीन दिवसांत दोन ते तीनदा मंत्रिपदाची शपथ दिल्यासारखं दिसतंय”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील दिली आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आमच्या कोणाशीही चर्चा सुरू नाहीत. विलीनीकरणाची कोणतीही चर्चा या क्षणापर्यंत झालेली नाही. सध्या देखील विलीनीकरणाबाबत कोणाशीही आमची चर्चा चालू नाही. तरीही सध्या माध्यमांमधून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, ते पाहून आमचीच करमणूक होत आहे. त्यामुळे वारंवार त्यावर प्रतिक्रिया तरी कशा द्यायच्या?”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. “आम्ही सध्या विरोधातच काम करत आहोत. कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो की, शरद पवारांबरोबर सर्व निष्ठेने राहिले आहेत आणि राहत आहेत. तसेच सर्व आमदार आणि सर्व खासदार देखील ठामपणे शरद पवार यांच्यामागे आहेत”, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

